मुंबई : भारताच्या फिनटेक क्षेत्राने गेल्या दशकात जगभरात वेगळी ओळख निर्माण केली असून, आता डिजिटल पेमेंट्सच्या पुढे जाऊन कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शनसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुंबईतील बीकेसी येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, ग्लोबल फिनटेक फेस्टचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन तसेच देश-विदेशातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारतातील तरुणांची नवकल्पना, जोखीम घेण्याची तयारी आणि मोठी स्वप्ने विकसित भारताच्या निर्मितीला गती देत असल्याचे सांगत मोदी यांनी जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताने ७.८ टक्के आर्थिक विकासदर नोंदविल्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, डिजिटल इंडियामुळे बँकिंग सेवा सामान्य नागरिकांच्या हातातील मोबाईलपर्यंत पोहोचल्या असून, याचा सर्वात मोठा आधार यूपीआय ठरला आहे. २५ ऑगस्ट रोजी यूपीआयला १० वर्षे पूर्ण झाली असून, ऑगस्ट महिन्यात यूपीआयद्वारे तब्बल २,४०० कोटींपेक्षा अधिक व्यवहार नोंदवले गेले. आज यूपीआय ११ देशांमध्ये उपलब्ध असून, भारताने आता स्वतःची डिजिटल पेमेंट मानके विकसित करून ती जगभर पोहोचवावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी फिनटेक क्षेत्राने पारंपरिक बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या घटकांपर्यंत पोहोचण्याची गरज अधोरेखित केली. पीएम स्वनिधी योजनेमुळे लाखो पथविक्रेत्यांना औपचारिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यात यूपीआयची महत्त्वाची भूमिका राहिली असून, लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नात २० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. छोट्या व्यावसायिकांना सहज कर्ज, विमा, बचत आणि पेन्शनसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी फिनटेक क्षेत्राने अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी नमूद केले. पुढील काळात एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानामुळे वित्तीय क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे सांगत त्यांनी उद्योगासमोर चार महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांची रूपरेषा मांडली. जागतिक दर्जाची सायबर सुरक्षा, मजबूत डेटा संरक्षण व्यवस्था, नवोन्मेषाला चालना देणारी प्रभावी नियामक प्रणाली आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारा ‘फिनटेक कन्झ्युमर प्रोटेक्शन इंडेक्स’ विकसित करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. भारत केवळ डिजिटल व्यवहारांमध्येच नव्हे, तर जागतिक फिनटेक नवकल्पनांचे नेतृत्व करणारा देश म्हणून उदयास यावा, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.






