ठाणे : दिवाळीचा आनंद साजरा करत असताना देशाच्या सीमांवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ठाणे आणि डोंबिवली शहरांतून यंदाही दिवाळी फराळ पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सीमेवरील अतिदुर्गम चौक्यांपर्यंत फराळ सुरक्षित आणि वेळेत पोहोचावा यासाठी नियोजनाला सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील नमस्ते शौर्य फाऊंडेशन आणि ठाण्यातील नाना साठे प्रतिष्ठान या दोन संस्थांच्या माध्यमातून एकूण १४ हजार सैनिकांना दिवाळी फराळाचे संच पाठविण्यात येणार आहेत. देशासाठी कुटुंबापासून दूर राहून कठोर परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या जवानांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. नमस्ते शौर्य फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम सलग आठव्या वर्षी राबविण्यात येत असून यंदा १२ हजार सैनिकांपर्यंत फराळ पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी तवांग (अरुणाचल प्रदेश), कुपवाडा (काश्मीर), जम्मू, द्रास (कारगिल) आणि सियाचेन या अतिदुर्गम आणि संवेदनशील सीमावर्ती भागांतील जवानांची निवड करण्यात आली आहे. फराळाच्या संचात चकली, चिवडा आणि पौष्टिक लाडू यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या पॅकिंग आणि वाहतुकीची तयारी सध्या सुरू आहे.
दुसरीकडे, नाना साठे प्रतिष्ठान यांच्यावतीनेही सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम राबविला जाणार आहे. संस्थेतर्फे यंदा सहा ते सात सैनिकी तळांवरील दोन हजार जवानांना दिवाळी फराळाचे संच पाठविले जाणार आहेत. या दोन्ही उपक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे लोकसहभागातून साकारले जातात. नागरिक आर्थिक मदत करण्याबरोबरच फराळाचे संच तयार करणे, पॅकिंग करणे, वर्गीकरण, वाहतुकीसाठी साहित्य तयार ठेवणे आणि योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी श्रमदान देखील करतात. दरवर्षी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या वाढत असून समाजातील विविध घटक त्यामध्ये उत्साहाने योगदान देत आहेत. सैनिकांपर्यंत केवळ फराळ नव्हे, तर समाजाचा स्नेह, आदर आणि कृतज्ञतेची भावना पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या जवानांनाही आपलेपणाची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो फराळ संच सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचे हास्य फुलविण्याचा संकल्प या दोन्ही संस्थांनी केला आहे.






