ठाणे : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडे मंडप उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असले, तरी प्रत्यक्ष परवानग्या देण्याचा वेग अत्यंत संथ असल्याचे समोर आले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत गणेशोत्सवासाठी एकूण १७४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ ९ मंडपांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने यंदा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज स्वीकारले होते. त्यानुसार १११ अर्ज ऑनलाइन, तर ६३ अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल झाले. मात्र मंजुरीची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा खूपच धीम्या गतीने सुरू असल्याने मंडप उभारणी, विद्युत जोडणी, अग्निसुरक्षा, ध्वनिक्षेपक परवानगी, वाहतूक नियोजन आणि इतर आवश्यक तयारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक मंडळांनी वेळेत अर्ज करूनही अद्याप परवानगी न मिळाल्याने त्यांचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध विभागांमधून मोठ्या संख्येने अर्ज आले असले तरी मंजुरीचा वेग कमी असल्याने मंडळांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः वागळे, माजिवडा-मानपाडा, कळवा, लोकमान्यनगर-सावरकरनगर, दिवा, नौपाडा, उथळसर, वर्तकनगर आणि मुंब्रा या भागांतील मंडळे अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार गणेशोत्सवासाठी वागळे प्रभाग समितीत सर्वाधिक २६ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २३ ऑनलाइन आणि ३ ऑफलाइन अर्ज आहेत. मात्र केवळ २ मंडपांना मंजुरी मिळाली आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत तब्बल ३३ अर्ज दाखल झाले असले तरी एकाही मंडपाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कळवा येथे २६, लोकमान्यनगर-सावरकरनगर येथे २४, उथळसर येथे १७, वर्तकनगर येथे १५, नौपाडा येथे १२, दिवा येथे ११ आणि मुंब्रा येथे ४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी लोकमान्यनगर-सावरकरनगर, माजिवडा-मानपाडा, दिवा आणि नौपाडा-कोपरी या विभागांमध्ये एकाही मंडपाला मंजुरी मिळालेली नसल्याने संबंधित मंडळांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे दहीहंडी उत्सवासाठी परवानगी प्रक्रिया तुलनेने वेगाने सुरू असल्याचे दिसून आले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ५५ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २८ मंडपांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ५ अर्ज ऑनलाइन तर ५० अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल झाले होते. वागळे येथे १० पैकी ६, लोकमान्यनगर-सावरकरनगर येथे २ पैकी २, वर्तकनगर येथे ११ पैकी ५, माजिवडा-मानपाडा येथे १० पैकी ३ तसेच उथळसर आणि कळवा येथे अनुक्रमे ४ आणि ६ अर्जांपैकी प्रत्येकी ३ मंडपांना परवानगी मिळाली आहे. मात्र दिवा येथे २ अर्ज असूनही एकाही मंडपाला मंजुरी मिळालेली नाही, तर मुंब्रा विभागातून दहीहंडीसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. गणेशोत्सव जवळ येत असताना उर्वरित अर्जांवरील निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून केली जात आहे.






