नाशिक : समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूरदरम्यान दोन वाहनांमधील प्रवाशांना लुटून १८ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी पाच आरोपी फरार आहेत. अटक केलेले संशयित आरोपी धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी धारदार लोखंडी वस्तू रस्त्यावर टाकून दोन ते तीन वाहनांचे टायर फोडले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका कुटुंबाच्या कारला अडवून प्रवाशांना मारहाण करण्यात आली आणि तब्बल १८ लाख रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले. ही घटना समृद्धी महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात असल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दहा पथकांची नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणासह मेडिकल दुकाने, ग्रामपंचायती, हॉटेल्स आणि इतर ठिकाणची माहिती तपासण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या एका महत्त्वपूर्ण धाग्यावरून पोलिसांनी आरोपींपर्यंत मजल मारली. या कारवाईत अर्जुन पवार, अशोक शिंदे, लखन काळे, धनाजी पवार, नितीन शिंदे आणि गोविंद पवार यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अशोक शिंदे आणि अर्जुन पवार हे या टोळीचे सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन्ही वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी तेरखेडा, पाणगाव, खामकरवाडी आणि उमरा या गावांमध्ये पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दरोडेखोरांनी घटनास्थळापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आपली वाहने उभी केली होती. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील हालचालींचाही बारकाईने तपास केला. पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी सांगितले की, घटनेनंतर पोलीस तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले. तपासासाठी दहा पथके कार्यरत होती. तांत्रिक विश्लेषणासोबत विविध ठिकाणची माहिती तपासल्यानंतर महत्त्वाचा धागा मिळाला आणि त्याच्या आधारे सात आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण १२ आरोपी असून, उर्वरित पाच जणांचा शोध सुरू आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी बंदोबस्ताची नव्याने आखणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.






