मुंबई : रेल्वे स्थानक किंवा परिसरात कचरा फेकणे, थुंकणे यांसह अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांवर आता कडक कारवाई होणार आहे. भारतीय रेल्वेच्या नव्या शास्ती सुधारणा नियमांनुसार अशा प्रकारांसाठीचा दंड ५०० रुपयांवरून १ हजार रुपये करण्यात आला आहे. दंड भरण्यास नकार दिल्यास संबंधित व्यक्तीला सक्षम न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते. रेल्वे परिसरात कचरापेटीशिवाय कचरा फेकणे, स्वयंपाक करणे, अंघोळ किंवा कपडे धुणे, थुंकणे, उघड्यावर लघुशंका अथवा शौच करणे, प्राणी-पक्ष्यांना अन्न देणे, वाहने धुणे, अनधिकृतपणे सामान ठेवणे तसेच पोस्टर लावणे यांसारख्या प्रकारांवर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार १ हजार रुपयांचा दंड न भरल्यास प्रकरण न्यायालयात जाऊ शकते. सक्षम न्यायालयाला अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीवर २ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार असेल. रेल्वे स्थानकांचा दररोज लाखो प्रवासी वापर करत असल्याने स्वच्छता राखण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यास प्रवाशांना प्रवृत्त करण्यासाठी दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे.
‘हे’ प्रकार केल्यास भरावा लागणार दंड :
• कचरापेटीशिवाय कचरा फेकणे
• रेल्वे परिसरात स्वयंपाक करून धोका निर्माण करणे
• रेल्वे परिसरात अंघोळ करणे किंवा कपडे धुणे
• रेल्वे परिसरात थुंकणे
• उघड्यावर लघुशंका किंवा शौच करणे
• प्राणी किंवा पक्ष्यांना अन्न देणे
• रेल्वे परिसरात वाहने धुणे
• रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे सामान ठेवणे
• रेल्वे परिसरात पोस्टर लावणे






