जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे मोर्चा वळविण्याची रणनीती जाहीर केली आहे. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाला टप्प्याटप्प्याने मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले. आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना त्यांनी कार्यकर्त्यांना ‘गनिमी कावा’ पद्धतीने नियोजन करण्याचा सल्ला दिला. मुंबईत राहणाऱ्या नातेवाईक, मित्र किंवा पाहुण्यांशी संपर्क साधून राहण्याची व्यवस्था करून ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, उपोषणस्थळी दररोज हजारो आंदोलक उपस्थित राहत आहेत. आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर समाजबांधवांनी पोहोचावे, असे आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईत लाखो मराठा कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत सर्वांनी राहण्याची व्यवस्था करून ठेवावी. मात्र, सध्या मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ किंवा आझाद मैदानाकडे जाऊ नये. मुंबईतील जिथे जागा मिळेल तिथे मुक्काम करावा, पण या दोन ठिकाणी जाणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. आंदोलनाची रणनीती आखताना संयम राखण्यावर त्यांनी विशेष भर दिला असून, नियोजनबद्ध आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले.
आंदोलनादरम्यान पोलिसांशी कोणताही संघर्ष किंवा वाद घालू नये, असे सांगत जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. “पोलिसांना कोणताही त्रास देऊ नका. एखाद्याला पोलीस ठाण्यात बोलावले, तरी शांतपणे जाऊन भेटून या,” असे ते म्हणाले. पुढील काही दिवसांत मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक मुंबईच्या दिशेने रवाना व्हावेत, असे आवाहनही त्यांनी केले. जरांगे पाटील यांच्या या नव्या भूमिकेमुळे मराठा आंदोलन पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळातही मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते. त्या वेळी दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता आणि काही महत्त्वाचे मार्ग बंद ठेवावे लागले होते. यंदाही मोठ्या प्रमाणावर आंदोलक मुंबईत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संकेत जरांगे पाटील यांनी दिले असून, आगामी काळात आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






