नाशिक : विद्यापीठांनी केवळ पदवीधर तयार करण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योग आणि स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम इनक्युबेशन परिसंस्था उभारावी. भविष्यातील मोठे उद्योग, नवोन्मेष आणि ‘युनिकॉर्न’ कंपन्या विद्यापीठांतूनच निर्माण व्हाव्यात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे आयोजित कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार भास्कर भगरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगातील अनेक आघाडीच्या कंपन्या आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उगम विद्यापीठांतून झाला आहे. त्यामुळे संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारी संस्कृती विद्यापीठांनी विकसित करणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या दिशेने काम सुरू केले असले, तरी बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार संशोधन आणि स्टार्टअप परिसंस्था अधिक मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, जागतिकीकरणानंतर शिक्षण, रोजगार आणि उद्योग यांचा परस्पर संबंध अधिक दृढ झाला आहे. केवळ पदवीधारकांची संख्या वाढविण्यापेक्षा रोजगारक्षम आणि कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करणे ही काळाची गरज आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण अधिक रोजगाराभिमुख करण्यावर भर दिला जात असून, विद्यार्थ्यांना भविष्यातील बदलत्या रोजगार बाजारासाठी सक्षम बनवणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), डेटा सायन्स आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्ये देणे गरजेचे आहे. नाशिक उपकेंद्रात डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. नाशिकच्या औद्योगिक विकासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, कृषी, द्राक्ष निर्यात, अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स, लाइफ सायन्सेस आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात नाशिककडे मोठ्या संधी आहेत. गेल्या दोन वर्षांत शहरात सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, पुढील पाच वर्षांत मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक हे महाराष्ट्राच्या विकासाचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक उपकेंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून, विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि कौशल्यविकासावर विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या उपकेंद्राचा नाशिकसह संपूर्ण परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी उपकेंद्राची माहिती देताना सांगितले की, दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे ६२ एकर जागेत हे उपकेंद्र विकसित होत असून, सध्या ३३ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या आधुनिक इमारतीत विविध सुविधा उपलब्ध आहेत. उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात नाशिक जिल्ह्यासह दादरा-नगर हवेली आणि सिल्व्हासा येथील १९६ महाविद्यालयांचा समावेश असून, सुमारे अडीच लाख विद्यार्थी आणि २,६०० शिक्षक या केंद्राशी संलग्न आहेत. येथे मोफत ई-लायब्ररी, संगणक व भाषा प्रयोगशाळा, रोजगार व प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थी सुविधा केंद्र आणि विविध आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून, भविष्यात तंत्रज्ञान, विधी आणि रोजगाराभिमुख पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच संशोधन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.






