नागपूर : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अशोक सराफ यांच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपूरमध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठी माणसाच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, आनंद, दुःख आणि मर्यादा यांचे अत्यंत प्रभावी चित्रण अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून केले आहे. त्यांच्या भूमिका केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर सामान्य माणसाच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या होत्या. त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयातून सर्वसामान्यांच्या आयुष्यातील प्रसंगांना हास्याची किनार देत मराठी चित्रपट अधिक लोकाभिमुख केला. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला वेगळी ओळख आणि उंची मिळाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. अशोक सराफ यांच्यासारखा कलाकार लाभणे हे मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि प्रत्येक रसिकासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या अनेक दशकांच्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या अभिनयामुळे अनेक पिढ्या घडल्या, असंख्य कलाकारांना प्रेरणा मिळाली आणि मराठी चित्रपटांची गोडी घराघरांत पोहोचली, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाला महापौर नीता ठाकरे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संदीप जोशी, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र बोरकर, आयुक्त डॉ. विपीन इटनकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेत त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. रसिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या अभिनय प्रवासाला सलाम केला.
कार्यक्रमात अशोक सराफ यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, तर विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे डॉ. गिरीश गांधी यांनी सन्मानचिन्ह आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. श्री सिद्धीविनायक ट्रस्टतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. ऐंशीव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने त्यांचे तब्बल ८० दिव्यांनी औक्षण करण्यात आले, ज्यामुळे सभागृहात भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी आपल्या नेहमीच्या साधेपणातून भावना व्यक्त करत सांगितले की, “आजवर माझा इतका भव्य सत्कार कधीच झाला नव्हता. कलाकार म्हणून आम्हाला मिळणारे प्रेम हेच आमचे खरे बळ आहे. प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत.” त्यांच्या या शब्दांना उपस्थितांनी उभे राहून दाद दिली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रेक्षक, सहकारी कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना दिले. अनेक दशकांपासून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी आणि भावनिक अभिनयाने त्यांनी वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या चित्रपटांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर मराठी संस्कृती, कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक मूल्येही प्रभावीपणे मांडली. आजही त्यांच्या भूमिका तितक्याच लोकप्रिय असून नव्या पिढीतील कलाकारांसाठी त्या प्रेरणादायी मानल्या जातात. त्यामुळे नागपूरमध्ये झालेला हा नागरी सत्कार केवळ एका अभिनेत्याचा गौरव नसून मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या चित्रपट प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आणि त्यांच्या दीर्घ, यशस्वी तसेच प्रेरणादायी कलाप्रवासाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत अभिवादन केले.






