मुंबई : पुणे जिल्ह्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सहज उपलब्ध आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली असून लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी लोहगाव उपजिल्हा रुग्णालयासह पुणे जिल्ह्यातील विविध प्रलंबित आरोग्यविषयक कामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या, मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करून उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने प्रलंबित प्रस्तावांवरील कार्यवाहीला गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार सुनील टिंगरे, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोहगाव उपजिल्हा रुग्णालय परिसरातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच बांधकामाची गुणवत्ता आणि आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्यावरही भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. नागरिकांच्या सेवेत रुग्णालय प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर संबंधित विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पुणे जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांशी संबंधित प्रस्तावांचीही सविस्तर चर्चा करण्यात आली. बांधकाम पूर्ण झालेल्या आरोग्य केंद्रांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच महानगरपालिकेतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्थलांतरासंदर्भातील प्रस्ताव आणि एएनएम केंद्रांवरील भरतीबाबतही तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत खेड तालुका, राजगड (वेल्हे), चाकण आणि महाळुंगे परिसरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. राजगड (वेल्हे) येथे नवीन ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारणे आणि त्यासाठी आवश्यक पदांना मंजुरी देणे, चाकण उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच महाळुंगे (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एमआयडीसीची जागा जिल्हा परिषदेकडे तातडीने वर्ग करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. खेड तालुक्यातील आंबेठाण औद्योगिक क्षेत्र लक्षात घेऊन तेथे नवीन आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देण्याचे आदेशही त्यांनी दिले. याशिवाय दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करणे, खेड-राजगुरुनगर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला गती देणे आणि चाकण उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बालकांच्या जन्मनोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचाही बैठकीत गंभीरपणे विचार करण्यात आला. आधार नोंदणी ‘सीआरएस’ प्रणालीमध्ये जनरेट होत नसल्यामुळे अनेक बालकांच्या जन्मनोंदणीला विलंब होत असल्याची बाब समोर आली असून, या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला. आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी खेड तालुक्यातील पाईट येथे २४ तास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले. बैठकीच्या शेवटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आरोग्यविषयक निर्णय केवळ कागदोपत्री न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे, यावर भर देत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित प्रस्तावांचा वेळेत निपटारा करावा आणि प्रत्येक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे स्पष्ट निर्देश दिले.






