पुणे : पावसाळा, शनिवार-रविवार आणि सलग सुट्ट्यांमध्ये सिंहगड किल्ल्यावर होणारी प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि वाढत्या सुरक्षेच्या समस्या लक्षात घेऊन वन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सिंहगडावर पर्यटकांना किल्ल्याच्या सुरक्षित क्षमतेनुसारच प्रवेश दिला जाणार आहे. एकावेळी किल्ल्यावर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक पर्यटक पोहोचल्यास पुढील पर्यटकांचा प्रवेश तात्पुरता बंद करण्यात येईल. यामुळे गर्दीचे नियोजन, पर्यटकांची सुरक्षितता आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे विशेषतः शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी किल्ल्यावर होणारी अनियंत्रित गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. सिंहगडाची पर्यटक क्षमता म्हणजेच ‘कॅरिंग कॅपॅसिटी’ वैज्ञानिक पद्धतीने निश्चित करण्याचे काम वन विभागाकडून सुरू आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीच्या मदतीने किल्ल्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांची संख्या, विविध ठिकाणची गर्दी आणि वाहतुकीची स्थिती यावर रिअल-टाइममध्ये नजर ठेवली जाणार आहे. यामुळे परिस्थितीनुसार प्रवेश नियंत्रित करणे आणि आवश्यक असल्यास तातडीने उपाययोजना करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
पर्यटकांचा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी वन विभाग स्वतंत्र मोबाईल ॲप देखील विकसित करत आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या सिंहगडावरील गर्दीची सद्यस्थिती, पार्किंगची उपलब्धता, वाहतुकीची माहिती तसेच किल्ल्यावरील पर्यटन सुविधांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे पर्यटकांना योग्य वेळ निवडून किल्ल्यावर जाण्याचे नियोजन करता येईल. पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांनी ही माहिती देताना या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. दरम्यान, सिंहगडावर वाढणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी वन विभागाने सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ल्यावर सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात आली असून, वन विभाग आणि पोलिसांशी असहकार्य करणाऱ्या किंवा कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अलीकडेच सिंहगडावर पर्यटकांशी गैरवर्तन आणि शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक देखरेख ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळ्यात सिंहगड परिसरात दरडी कोसळणे, निसरडे रस्ते, चिखल आणि घसरडी वाट यामुळे अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन वन विभागाने केले आहे. किल्ल्यावर कचरा टाकू नये, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करू नये, धोकादायक कड्यांवर जाऊन सेल्फी काढणे टाळावे, मद्यपान करून प्रवेश करू नये आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवून इतर पर्यटकांना त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ऐतिहासिक वारसा जपत आणि पर्यावरणाचे संरक्षण करत सुरक्षित पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा या नव्या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.






