वसई : दोन महिने उलटूनही वसई बस आगारात एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरण करण्यासाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे कार्ड नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि इतर सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे. या कार्डसाठी १४९ ते २०० रुपये शुल्क आकारले जात असून, नियुक्त कंत्राटदारामार्फत बस आगारांमध्ये कार्डची नोंदणी व वितरण केले जाते. वसई-विरार शहरातील वसई, नालासोपारा आणि अर्नाळा बस आगारांमध्ये फेब्रुवारीपासून एनसीएमसी कार्डची नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, वसई आगारातील नियुक्त कंत्राटदाराकडून नोंदणी प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन महिने उलटूनही ही नियुक्ती झालेली नसल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे. सध्या वसई बस आगारात दर शनिवारी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली जाते. मात्र, त्यासाठी केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. ऑल इंडिया कन्झ्युमर्स फोरमचे अध्यक्ष शंकर बने यांनीही या परिस्थितीमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे.
एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी आता अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिल्याने वसई आगारातील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. कार्ड नोंदणीची अंतिम मुदत जवळ येत असताना बस आगारांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत आहे. वसई आगारात केवळ एकच कर्मचारी नोंदणीचे काम करत असल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर काही प्रवाशांना नोंदणीसाठी नालासोपारा बस आगारात पाठवले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे वसईतील प्रवाशांना कार्डसाठी दुसऱ्या आगारात जावे लागत असल्याने त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाढत आहे. एनसीएमसी कार्डच्या नोंदणी व वितरणासाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. दरम्यान, नव्या कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत वितरक कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्यामार्फत दर शनिवारी वसई बस आगारात नोंदणी सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, वाढती गर्दी आणि कमी मनुष्यबळ पाहता ही व्यवस्था अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि इतर सवलतधारक प्रवाशांना वेळेत एनसीएमसी कार्ड मिळावे यासाठी अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देणे, नोंदणीचे दिवस वाढवणे आणि नव्या कंत्राटदाराची नियुक्ती तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.






