पुणे : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या दूध भेसळ प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांनी मोठी कारवाई करत या रॅकेटमधील आणखी १० आरोपींना अटक केली आहे. मंचर पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या २४ वर पोहोचली आहे. या प्रकरणात काही राजकीय संबंध असल्याची चर्चा सुरू असल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. ४ जुलै रोजी एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला होता. तपासादरम्यान मुख्य आरोपींकडून भेसळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणाऱ्या आणखी १० जणांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे दूध भेसळ प्रकरणाचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, दुधाचे प्रमाण आणि घट्टपणा वाढवण्यासाठी भेसळखोरांकडून विशेष प्रकारचा वास न येणारा शाम्पू, मानवी आरोग्यास घातक रसायने तसेच निकृष्ट दर्जाची दूध पावडर वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून आर्थिक फायदा मिळवण्याचा हा प्रकार असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्या १० आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे भेसळ रॅकेट आणखी कोणत्या जिल्ह्यांपर्यंत पसरले आहे, तसेच यामागे आणखी कोणाचा सहभाग किंवा वरदहस्त आहे का, याचा सखोल तपास मंचर पोलीस करत आहेत. तपास पुढे सरकत असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






