मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षक पदांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. राज्यभरातील विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या एकूण ३० हजार २०९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी)-२०२५ ही ऑनलाइन पद्धतीने २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या चाचणीसाठी राज्यभरातून २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे. पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध विभागांकडून रिक्त पदांची भरती मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५१, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४, नगर पालिका व नगर परिषदांच्या २८०, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या १२ हजार १४८, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील २ हजार ४२१ आणि शासकीय विद्यानिकेतनमधील ५६ पदांचा समावेश आहे. या एकूण ३० हजार २०९ पदांपैकी १९ हजार ८८१ पदे मुलाखतीशिवाय, तर खाजगी संस्थांमधील १० हजार ३२८ पदे मुलाखतीसह भरली जाणार आहेत.
या भरतीमध्ये विविध इयत्तांनुसारही मोठ्या प्रमाणात पदांचा समावेश आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी १४ हजार ३२० पदे, इयत्ता सहावी ते आठवीसाठी १० हजार १२ पदे, इयत्ता नववी व दहावीसाठी ५ हजार ५१३ पदे, तर इयत्ता अकरावी व बारावीसाठी ३६४ पदे उपलब्ध आहेत. पदभरतीसाठी पात्र उमेदवारांना पवित्र पोर्टलवरील संबंधित संकेतस्थळावर पदनिहाय प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक सुविधा ६ ऑगस्ट २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी उपलब्ध पदांची माहिती पाहून आपल्या पसंतीनुसार पदनिहाय प्राधान्यक्रम नोंदविणे आवश्यक असून, हा पसंतीक्रम ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत लॉक करावा लागणार आहे. निर्धारित मुदतीत प्राधान्यक्रम निश्चित करून लॉक केल्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांसाठी गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून निर्धारित वेळेत आपला पसंतीक्रम नोंदविणे आणि लॉक करणे आवश्यक आहे. पदभरती प्रक्रियेसंदर्भात उमेदवारांना काही सूचना, मागण्या किंवा तक्रारी असल्यास त्यांनी त्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठवाव्यात. यासाठी edupavitra25@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या मोठ्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे राज्यातील पात्र उमेदवारांना विविध शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक पदासाठी संधी उपलब्ध झाली आहे.






