मुंबई : देशातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूर येथे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील एका युगाचा अंत झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अंबाप येथे साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि समाजाभिमुख विचारांच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात भव्य कार्य उभारले. सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांनी काँग्रेस पक्षातून केली. १९५७ ते १९६२ या काळात कोल्हापूरचे महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले, तर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर जात शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि समाजकारणाला आयुष्य वाहिले. २००९ ते २०१३ या काळात त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल, तर २०१३ ते २०१४ दरम्यान बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. त्यांच्या नेतृत्वाखाली अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, व्यवस्थापन, विधी, नर्सिंग, फार्मसी, कृषी आणि इतर शाखांतील १८० हून अधिक शैक्षणिक संस्था तसेच अनेक विद्यापीठांचे विशाल जाळे उभे राहिले. ग्रामीण आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचा त्यांचा ध्यास आयुष्यभर कायम राहिला. शिक्षणासोबतच त्यांनी आरोग्य क्षेत्रात रुग्णालये, संशोधन केंद्रे आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक दर्जाचे डी. वाय. पाटील स्टेडियम उभारून महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिक्षण व समाजसेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी भारत सरकारने त्यांना १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना शून्यातून शिक्षणाचे विश्व उभारणारे दूरदर्शी व्यक्तिमत्त्व म्हणत श्रद्धांजली अर्पण केली. पवार, सुळे आणि पाटील कुटुंबांतील अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित करत त्यांनी त्यांच्या निधनाला वैयक्तिक हानी असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांना केवळ ‘शिक्षणसम्राट’ नव्हे, तर समाजासाठी शिक्षणाचा प्रसार करणारे ‘शिक्षणमहर्षी’ असे संबोधले. शिक्षणसंस्था उभारण्यामागे समाजहिताची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद करत, राज्यपाल आणि लोकप्रतिनिधी म्हणूनही डॉ. पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली, अनेकांना रोजगाराचे मार्ग खुले झाले आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट झाली. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजकारण या चारही क्षेत्रांतील त्यांचे योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने दूरदृष्टी, सेवाभाव आणि शिक्षणाला आयुष्य अर्पण करणारे एक महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे.





