मुंबई : राज्यभरात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागामार्फत अन्नसुरक्षा आणि औषधांच्या गुणवत्तेबाबत सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत असतानाच, त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात विभागातीलच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एफडीए प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून मुंढे यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. तक्रारीनुसार, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात आले असून, रिक्त पदे भरली नसल्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडत आहे. सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत काम करण्याचा दबाव टाकला जात असल्याचा तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक आणि शारीरिक ताण वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
तक्रारदारांनी प्रयोगशाळेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि आवश्यक संसाधनांची कमतरता असल्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे. नमुन्यांची तपासणी कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी घाई केली जात असल्याने तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आयपी (Indian Pharmacopoeia), बीपी (British Pharmacopoeia) आणि यूएसपी (United States Pharmacopeia) या मानकांनुसार प्रयोगशाळा चाचण्या करण्यासाठी आवश्यक वेळ दिला जात नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या तक्रारपत्रावर संबंधित सर्व २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, त्यामुळे हा मुद्दा अधिक गंभीर मानला जात आहे. तक्रारीत प्रयोगशाळेतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदे तातडीने भरणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि कामकाजाची पद्धत अधिक व्यवहार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरात एफडीएकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर विभागातील अधिकाऱ्यांनीच कामाच्या परिस्थितीबाबत आवाज उठवल्याने या प्रकरणाची प्रशासन आणि राजकीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे.






