पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये मंगळवार (२१ जुलै) पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला असून गुरुवारीही संततधार कायम असल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी रात्री डहाणू शहरातील कंक्राडी, इराणी रोड, चंद्रिका हॉटेल परिसर, चंद्रसागर खाजन, प्रभुपाडा, वडकुन आणि केटी नगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. शहरात अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह तात्पुरत्या निवाऱ्यासाठी खुले करण्यात आले असून ते पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच घरांमध्ये पाणी शिरलेल्या सुमारे ३५० नागरिकांना वडकुन येथील महाविद्यालयाच्या इमारतीत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अनेक सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले आहे. बुधवारी रात्रीपासून दोन्ही तालुक्यांमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून मोबाईल नेटवर्क सेवाही ठप्प झाल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांनाही परिस्थितीचा आढावा घेण्यात अडचणी येत आहेत. कासा परिसरातील गायकवाड पाडा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कुटुंबाची स्थानिक नागरिकांनी धाडसाने सुटका केली, तर बोर्डी आणि घोलवड परिसरातही अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील रस्ते वाहतूकही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. डहाणू–चारोटी मार्गावरील गंजाड, सरावली, चारोटी आणि सारणी परिसरात रस्त्यावरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. डहाणू–चिंचणी आणि वाणगाव–चिंचणी मार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जामशेत–आशागड मार्गावर पाणी भरल्यामुळे तोही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कासा–सायवन मार्गावरील सायवन, वाघाडी आणि थेरोंडा परिसरात पुलांवरून पाणी ओसंडून वाहत असून खाणिव–सोनाळे भागातील नाले तुडुंब भरल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत घरांची पडझड झाली असून अनेक छोटे पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. तलासरी तालुक्यातही पूरस्थिती गंभीर बनली असून अंतर्गत रस्ते बंद झाल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तलासरी उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील एशियन पेट्रोल पंपाजवळील नाला ओसंडून वाहू लागल्याने त्याचे पाणी थेट महामार्गावर आले आहे. महामार्गावरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक लहान वाहनांना माघारी फिरावे लागत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






