पुणे : राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलकडील माहितीच्या आधारे पोलिसांच्या सायबर विभागाने विविध बँकांतील खात्यांची पडताळणी केली. तपासात अनेक खात्यांचा वापर ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणूक, डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन जॉब फ्रॉड, रिमोट ॲक्सेस ॲपद्वारे होणारी फसवणूक आणि इतर सायबर गुन्ह्यांमधील रक्कम फिरवण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सह पोलीस आयुक्त संजय दराडे म्हणाले की, सायबर गुन्हेगार पैसे मिळाल्यानंतर ते विविध खात्यांमधून फिरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. हीच खाती म्युल अकाउंट म्हणून वापरली जातात. काही खातेदार कमिशनसाठी आपली खाती सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात देतात. अशा खातेदारांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
खराडी ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात एका खात्यातून काही दिवसांत ३ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचे आढळले. हे खाते विविध सायबर फसवणुकांमध्ये वापरल्याचा संशय आहे. वाघोली ठाण्याच्या हद्दीतील एका खात्यातून १ कोटी ७६ लाखांचे व्यवहार झाले असून, विमानतळ ठाण्यात नोंदविलेल्या प्रकरणात १ कोटी २० लाखांची रक्कम फिरवली आहे. बाणेर ठाण्याच्या तपासात एका खासगी बँकेच्या खात्यातून ६५ लाख ५० हजार रुपयांची सायबर फसवणुकीची रक्कम हस्तांतरित झाली. संबंधित खाते गोठविले असून, त्याचे केवायसी तपशील मागविले आहेत. या खात्याचा वापर ठाणे, नागपूर तसेच मध्य प्रदेश, कर्नाटकातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी झाला. सायबर पोलीस संबंधित खातेदारांची केवायसी, आर्थिक व्यवहार, मोबाइल कॉल रेकॉर्ड, आर्थिक देवाणघेवाण आणि सायबर गुन्हेगारांशी असलेल्या संबंधाचा तपास करत आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारांना आर्थिक मदत करणाऱ्या म्युल अकाउंटच्या साखळीवर मोठा आघात होईल. कमिशनच्या लालसेपोटी कोणालाही स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक किंवा नेट बँकिंगची माहिती देऊ नये. असे केल्यास संबंधिताला सायबर गुन्ह्यात सहआरोपी केले जाईल.






