पंढरपूर : आषाढी वारी म्हणजे केवळ भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर नव्हे, तर हजारो छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचाही महत्त्वाचा आधार आहे. “वारी संगे चालताना, मुखी यावे रामनाम | काम होता विठ्ठल, मिळे समाधान” या अभंगाचा प्रत्यय देणाऱ्या या वारीत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना त्यांच्या सोबत अनेक छोटे-मोठे व्यावसायिकही आपला संसाराचा गाडा चालवत असल्याचे चित्र पाहायला मिळते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथून निराच्या दिशेने पुढे रवाना झाला असून, या पालखीसोबत विविध प्रकारचे व्यावसायिकही पायी प्रवास करत आहेत.
जवळपास महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात वारकऱ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारचे व्यवसाय फुलताना दिसतात. पान-फुले विक्रेते, गंध लावणारे, मोबाईल चार्जिंगची सुविधा देणारे, चप्पल विक्री व दुरुस्ती करणारे, चहा-नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याचे विक्रेते, बॅग व चेन दुरुस्ती करणारे, केस कर्तनालय, मसाज सेवा देणारे, खेळणी, शीतपेये, चणे-फुटाणे तसेच विविध किरकोळ वस्तू विकणारे व्यावसायिक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असतात. वारीत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांमुळे या व्यावसायिकांना चांगली कमाईची संधी मिळते. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच विविध स्तरांतील भाविक या वारीत सहभागी होत असल्याने त्यांच्याकडून विविध सेवांना मोठी मागणी असते. अनेक कुटुंबे पती-पत्नींसह विठ्ठलनामाचा गजर करत व्यवसायही सांभाळतात आणि भक्ती व उदरनिर्वाहाचा सुंदर समतोल साधतात. वारीतील प्रत्येक मुक्काम हा स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही मोठी संधी ठरत आहे. पालखी ज्या गावात मुक्काम करते, त्या ठिकाणी चहा-नाश्ता, पूजा साहित्य, किरकोळ वस्तू, दाढी-केस कर्तनालय, पादत्राणे दुरुस्ती, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सेवांना मोठी मागणी निर्माण होते. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांसह पालखीसोबत चालणाऱ्या विक्रेत्यांनाही चांगला व्यवसाय मिळतो. वारीत भक्ती आणि सेवा यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालही होत असून, अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला त्याचा आधार मिळत आहे. वारकऱ्यांची सेवा करत व्यवसाय करण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंड सुरू असून, त्यातून रोजगारालाही चालना मिळत आहे. वाल्हे येथे पालखीचा एक दिवस मुक्काम असल्याने गावासह परिसरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले. वारकऱ्यांची मोठी गर्दी, विविध सेवाभावी उपक्रम आणि व्यावसायिकांची लगबग यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून गेला. स्थानिक दुकानदार, फेरीवाले आणि सेवा देणारे व्यावसायिक यांना या काळात चांगला व्यवसाय मिळाल्याने त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली. अशा प्रकारे आषाढी वारी ही केवळ आध्यात्मिक सोहळा नसून भक्ती, सेवा, सामाजिक एकात्मता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा महत्त्वाचा उत्सव ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.






