मुंबई : गेली ३८ वर्षे खासगी कोचिंग क्षेत्रात अग्रस्थानावर असलेली एम.टी. एज्युकेअर लिमिटेड (महेश ट्युटोरियल्स) ही नामांकित शिक्षणसंस्था अचानक बंद करण्यात आली आहे. विद्यार्थी किंवा पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यातील सर्व शाखा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हजारो विद्यार्थी आणि पालकांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये चांगल्या निकालासाठी ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेवर पालकांचा मोठा विश्वास होता. मात्र, संस्थेच्या अचानक बंदमुळे ८ वी ते १० वी (सीबीएसई, आयसीएससी), १२ वी, जेईई आणि नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अनिश्चित झाले आहे. लाखो रुपयांची फी भरलेल्या पालकांसमोर आर्थिक आणि मानसिक संकट उभे राहिले आहे. संस्था बंद होण्यामागे गंभीर आर्थिक अडचणी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अधिकृत लेखापरीक्षणात (ऑडिट) आर्थिक व्यवहारांमधील गंभीर अनियमितता आढळून आली होती. गेल्या दोन वर्षांपासून कंपनीची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत होती. सध्या कंपनीवर सुमारे ३२.३३ कोटी रुपयांचे थकीत कर्ज असून, काही वादग्रस्त कॉर्पोरेट गॅरंटीची आर्थिक जबाबदारीही कंपनीवर आहे. त्यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत सापडल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ७ जुलै रोजी संस्थेने सर्व शाखा चालकांची तातडीची बैठक घेतली होती. त्यानंतर १० जुलैपासून राज्यातील सर्व शाखा तात्काळ बंद करण्याचा निर्णय लागू करण्यात आला. महेश ट्युटोरियल्सच्या महाराष्ट्रात सुमारे ६० शाखा कार्यरत होत्या, त्यापैकी ४० शाखा मुंबई महानगर क्षेत्रात होत्या. सध्या पालकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास शाखांचे दूरध्वनी क्रमांक बंद असून, काही ठिकाणी फोनची रिंग वाजत असली तरी संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परिस्थितीत मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी अरिहंत अकॅडमीने दिलासा देत बाधित विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेत प्रवेश देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, महेश ट्युटोरियल्सकडे आधीच भरलेली लाखो रुपयांची फी परत मिळणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह पालकांच्या पैशांचे भवितव्यही अनिश्चित राहिले असून, या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्यभर चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.






