सोलापूर : ‘सैराट’ फेम अभिनेता अरबाज शेख उर्फ सल्या यांनी सोशल मीडियावर केलेल्या आरोपांनंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलच्या मेडिकलवर तातडीने कारवाई केली आहे. वडिलांच्या उपचारादरम्यान रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा तसेच रुग्णांना हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप अरबाज शेख यांनी व्हिडिओद्वारे केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एफडीएचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मेडिकलची तपासणी करण्यात आली. तपासणीत अनेक त्रुटी आढळल्याने संबंधित मेडिकल सील करण्यात आले असून औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात रुग्णांच्या औषधांच्या चिठ्ठ्या थेट मेडिकलच्या संगणकावर दिसत असल्याचे आढळून आले. त्यामुळे रुग्णांना त्याच मेडिकलमधून औषधे घेणे बंधनकारक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मुदत संपलेली अनेक औषधेही तपासणीदरम्यान आढळल्याची माहिती एफडीएने दिली. प्रशासनाने रुग्णांना आवश्यक औषधे परिसरातील इतर अधिकृत मेडिकलमधून खरेदी करण्याचे आवाहनही केले आहे.
दरम्यान, नोबेल हॉस्पिटल प्रशासनाने अभिनेता अरबाज शेख यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, अतिदक्षता विभागातील रुग्णांना तातडीने औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून हॉस्पिटलमधील मेडिकलचा वापर केला जातो. मात्र, रुग्णांनी औषधे केवळ त्याच मेडिकलमधूनच खरेदी करावीत, असे कोणतेही बंधन नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच अरबाज शेख यांच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर वापरात न आलेली औषधे परत स्वीकारून त्यांचे पैसे परत करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणानंतर एफडीएकडून पुढील तपास सुरू असून नियमांचे उल्लंघन झाल्याचे अंतिम निष्कर्षात स्पष्ट झाल्यास आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेमुळे खासगी रुग्णालयांमधील औषध विक्रीची पद्धत, रुग्णांचे हक्क आणि औषध वितरणातील पारदर्शकता याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.






