मुंबई : जगभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मराठी समाजाला एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडण्यासाठी राज्य शासनाने ‘महाकनेक्ट’ संवादसेतू उपक्रम सुरू केला असून, या माध्यमातून जागतिक मराठी समुदायाशी संवाद अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे अमेरिकेतील विविध मराठी संस्थांच्या प्रतिनिधींशी आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच अमेरिकेतील विविध मराठी मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना जयकुमार रावल यांनी जगभरातील मराठी माणूस हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक राजदूत असल्याचे सांगितले. भारत आज जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून पुढे येत असून त्यामध्ये महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. उद्योग, तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण, उद्योजकता आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत मराठी समाजाने जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी समाजाने मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला, परंपरा आणि सण-उत्सव यांचे जतन करत महाराष्ट्राची ओळख जागतिक पातळीवर पोहोचवली आहे. विशेषतः अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळांनी मराठी संस्कृती जपण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य शासनाने राजशिष्टाचार विभागाच्या कार्यकक्षेत परकीय थेट गुंतवणूक तसेच प्रवासी भारतीयांशी संपर्क या विषयांचा समावेश केला असून, त्याअंतर्गत जगभरातील मराठी समुदायाशी सातत्यपूर्ण संवाद साधण्याचा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयकुमार रावल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील भारतीय समुदायाशी आत्मीय संबंध निर्माण करून भारतीयत्वाचा अभिमान अधिक दृढ केला आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाकनेक्ट’ हा संवादसेतू उपक्रम साकारण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील मराठी समाजाला एका डिजिटल व्यासपीठावर आणून शासनाशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गुंतवणूक, उद्योग, व्यापार, पर्यटन, नवउद्योग, धोरणात्मक चर्चा, ज्ञानाची देवाणघेवाण, जागतिक मराठी संस्थांचे जाळे अधिक बळकट करणे, सांस्कृतिक उपक्रम आणि युवकांचा सहभाग अशा विविध क्षेत्रांत सहकार्य वाढविण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे. जगभरातील मराठी समाजाकडील अनुभव, कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि कल्पनांचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हावा, यासाठी शासनाला विविध सूचना आणि मार्गदर्शन अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. या संवाद कार्यक्रमात अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळासह विविध मराठी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी महाराष्ट्राशी अधिक सक्षम आणि सातत्यपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी शासनाच्या या पुढाकाराचे स्वागत करत विविध विषयांवर सूचना आणि मते मांडली. शासन आणि जागतिक मराठी समाज यांच्यात विश्वास, सहकार्य आणि विकासाचा नवा दुवा निर्माण करण्यासाठी ‘महाकनेक्ट’ हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







