मुंबई : मुंबई आणि पश्चिम उपनगरांना बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने झोडपून काढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला, तर पश्चिम, मध्य आणि हार्बर उपनगरी रेल्वे मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावत असल्याने लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मुसळधार पावसामुळे अंधेरी येथील भुयारी मार्गात सुमारे पाच फूट पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला आणि प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळेत हार्बर मार्गावर वरील विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने अनेक लोकल गाड्या मार्गातच थांबल्या. रेल्वेच्या तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र सेवा सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागल्याने पनवेल, वाशी, नेरुळ, बेलापूर आणि इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. या बिघाडाचा परिणाम मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही सेवांवरही झाला असून अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि नागरिकांना कार्यालये, शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पाणी उपसण्याचे कामही वेगाने सुरू करण्यात आले.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ रोड येथील ‘सूर्यप्रकाश’ या म्हाडा सेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळून दुर्दैवी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत संतोष रामचंद्र भरासकर (वय ५१) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका सेवा, बेस्ट आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात आवश्यक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग यांनी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील काही तासांसाठी नारिंगी इशारा जारी केला आहे. काही भागांत मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग टाळावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याचाही इशारा देण्यात आला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली असून रेल्वे, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.







