शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. शिर्डी मंदिर परिसरातील पेढे विक्रेते आणि प्रमुख उत्पादन कारखान्यांवर टाकलेल्या संयुक्त छाप्यात सुमारे ६०० ते ७०० किलो संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत अंदाजे दोन लाख रुपयांच्या आसपास असून भाविकांच्या आरोग्याचा विचार करून संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत प्रसाद म्हणून पेढ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. मात्र काही दिवसांपासून पेढ्यांच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. प्रसादाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यास अपायकारक पेढे विकले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या तक्रारींची गंभीर दखल घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समिती, शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने अत्यंत गुप्ततेने नियोजन करून शिर्डीतील विविध पेढे विक्रेते आणि उत्पादन कारखान्यांवर एकाच वेळी छापे टाकले.
कारवाईदरम्यान शिर्डी आणि परिसरातील तीन प्रमुख पेढे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची सखोल तपासणी करण्यात आली. उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे साहित्य, साठवलेले पेढे आणि स्वच्छतेच्या नियमांची तपासणी करण्यात आली. यावेळी पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणांहून नमुने गोळा करून ते अधिकृत तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पेढ्यांमध्ये कोणत्या प्रकारची भेसळ करण्यात आली होती, हे स्पष्ट होणार आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगर विभागाच्या सहाय्यक आयुक्त अपर्णा भोईटे यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत पेढ्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळल्याने संपूर्ण साठा शिर्डी नगरपालिकेच्या डंपिंग ग्राऊंडमध्ये नेऊन यंत्रांच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला. प्रयोगशाळेच्या अहवालात भेसळ सिद्ध झाल्यास संबंधित कारखानदारांविरोधात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच निकृष्ट दर्जाचा माल विक्री करणाऱ्या दुकानदारांची माहितीही गोळा केली जात असून त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या धडक कारवाईनंतर शिर्डीतील व्यापारी आणि पेढे विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईची माहिती मिळताच अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांतील पेढ्यांचा साठा लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातील या कारवाईचे भाविकांनी स्वागत केले आहे. प्रशासनाने भाविकांना अधिकृत आणि परवानाधारक दुकानांतूनच प्रसाद खरेदी करण्याचे आवाहन केले असून भविष्यातही अशा विशेष तपासणी मोहिमा सातत्याने राबवल्या जाणार असल्याचा इशारा दिला आहे.







