मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या लोकलच्या डब्यात किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची घटना समोर आल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी रोशन सुवर्णाने पोलिस चौकशीत दिलेल्या माहितीतून घटनेमागील कारणे आणि त्यानंतरच्या घडामोडींचा उलगडा झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी रोशन सुवर्णा मद्यधुंद अवस्थेत होता. दिवसभर मद्यपान केल्यानंतर तो अंधेरी स्थानकातून लोकलमध्ये चढून आपल्या घराकडे निघाला होता. त्यावेळी मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे लोकलच्या उघड्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाणी डब्यात येत होते. याच कारणावरून डब्याचा दरवाजा बंद करण्याबाबत रोशन आणि त्याच डब्यात प्रवास करणारा मयंक लोहार यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला केवळ शाब्दिक बाचाबाची असलेला हा वाद काही वेळातच तीव्र झाला. चौकशीत आरोपीने सांगितल्याप्रमाणे, वाद वाढल्यानंतर मयंकने त्याला मारहाण केली. त्यानंतर काही इतर प्रवाशांनीही या वादात हस्तक्षेप करत रोशनला मारल्याचा दावा आरोपीने केला आहे. मद्याच्या नशेत असलेल्या रोशनचा त्यानंतर संताप अनावर झाला. सर्वांसमोर झालेली मारहाण आणि अपमानामुळे त्याने स्वतःवरील नियंत्रण गमावले. त्याने आपल्या बॅगेत ठेवलेले धारदार शस्त्र बाहेर काढले आणि मयंकवर हल्ला केला. काही क्षणांतच त्याने मयंकवर अनेक वार केल्याचे तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात मयंक गंभीर जखमी झाला. छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर लोकलच्या डब्यात एकच गोंधळ उडाला. प्रवासी घाबरून गेले आणि अनेकांनी तातडीने रेल्वे प्रशासन व पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, लोकलचा वेग कमी होताच आरोपीने रेल्वेतून खाली उतरून पळ काढला. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी त्याने हल्ल्यात वापरलेले शस्त्र बोरिवली परिसरातील एका भुयारी मार्गात फेकून दिल्याचे चौकशीत सांगितले आहे. तसेच हे शस्त्र त्याने स्वतः विकत घेतले नसून एका मित्राकडून आधीच घेतल्याची कबुलीही दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे. सध्या रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी आरोपीच्या प्रत्येक दाव्याची पडताळणी करत आहेत. लोकलमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे जबाब नोंदवले जात असून स्थानकांवरील तसेच रेल्वेतील चित्रफितींची तपासणी केली जात आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आरोपीला शस्त्र उपलब्ध करून दिल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.







