मुंबई : खेरवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या १२ ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या असून सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणांवरून ऑटोरिक्षा चोरीच्या घटना घडत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर १५ जून २०२६ रोजी बांद्रा पूर्व येथील कार्डिनल स्कूलसमोरील रस्त्यालगत उभी असलेली MH-02-EF-3211 क्रमांकाची ऑटोरिक्षा चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये मो. इक्बाल सिरताजअली शेख उर्फ लकी (वय २३) आणि मो. फरीद मिराजअली हाशमी (वय २०) हे दोघे संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. त्यानंतर गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींवर पाळत ठेवण्यात आली. तपासादरम्यान आरोपी चोरीच्या ऑटोरिक्षांचा वापर करून विविध बांधकाम साईटवरील भंगार चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच काम झाल्यानंतर चोरीच्या रिक्षा निर्जनस्थळी लपवून ठेवत असल्याचे उघड झाले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वाकोला पाइपलाइन परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ऑटोरिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून एकूण १२ ऑटोरिक्षा जप्त केल्या. तपासात खेरवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे क्रमांक ३०१/२०२६,३२०/२०२६, ३२५/२०२६,३२७/२०२६,३३०/२०२६ निर्मलनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे क्रमांक ५१५/२०२६,५२१/२०२६,५२६/२०२६
विलेपार्ले पोलीस ठाण्याचे गुन्हे क्रमांक ६४३/२०२६ तसेच वाकोला पोलीस ठाण्याचे गुन्हे क्रमांक ७०६/२०२६ उघडकीस आले आहेत. आरोपींपैकी मो. इक्बाल शेख उर्फ लकी याच्यावर यापूर्वीही खेरवाडी पोलीस ठाण्यात दरोडा, चोरी आणि प्रतिबंधात्मक कारवाईचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही उल्लेखनीय कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अभिनव देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (पश्चिम परिमंडळ-१) निमित गोयल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (खेरवाडी विभाग) संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुप्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुणाल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार तातोबा मोरे, गणेश सावंत, गणेश ठोंबरे, श्याम ठाकरे तसेच पोलीस शिपाई समीर कांबळे आणि महेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






