भिवंडी : भिवंडीतील खंडूपाडा परिसरात अन्नातून विषबाधेची गंभीर घटना घडली असून, शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर तब्बल ८० नागरिकांना उलट्या, पोटदुखी, मळमळ आणि जुलाबाचा त्रास झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना खंडूपाडा येथील ‘फेमस शोरमा’ या खाद्यपदार्थ विक्री केंद्राशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला १४ जणांना त्रास जाणवला होता, मात्र त्यानंतर बाधितांची संख्या वाढत जाऊन ८० वर पोहोचली. बाधितांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश असून त्यांच्यावर भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट केल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी संबंधित खाद्यपदार्थांचे तसेच रुग्णांच्या उलटीचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित ‘फेमस शोरमा’ दुकान सील करण्यात आले असून दुकानाचा मालक दिलशाद अन्सारी याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर भिवंडी महानगरपालिकेने अनधिकृत आणि अस्वच्छ पद्धतीने चालणाऱ्या खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर विशेष मोहीम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्यव्यवसायिकांवर कठोर पावले उचलली जात आहेत. अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील हॉटेल, उपाहारगृहे आणि खाद्यविक्री केंद्रांमध्ये तपासण्या वाढविण्यात आल्या असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे भिवंडी परिसरात मोठी चिंता व्यक्त होत असून सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







