विरार : वसई-विरार परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) धडक तपासण्या सुरू असतानाच विरार पश्चिमेतील आगाशी रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य बटरची पाकिटे, बुरशी लागलेले नूडल्स आणि इतर खराब झालेले खाद्यपदार्थ फेकून दिल्याचे आढळून आले. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. रस्त्यालगत आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे बॉक्स, बटरची पाकिटे, नूडल्सची पॅकेट्स आणि इतर खाद्यसाहित्य विखुरलेल्या अवस्थेत सापडले. यापैकी अनेक वस्तूंची मुदत डिसेंबर २०२५ मध्येच संपलेली असल्याचे दिसून आले, तर काही पॅकेट्समध्ये बुरशी निर्माण झालेली होती. त्यामुळे हा साठा बराच काळ लपवून ठेवण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. अन्नसुरक्षेचे नियम कठोर असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि मुदतबाह्य खाद्यसाठा आढळल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एफडीएकडून वसई-विरार परिसरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, गोदामे आणि किराणा दुकानांवर तपासणी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने काही व्यापाऱ्यांनी हा साठा रस्त्यावर फेकून दिल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे केवळ नागरिकांच्या आरोग्यालाच नव्हे तर पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर टाकलेले पदार्थ भटकी जनावरे, कुत्रे आणि पक्षी खात असल्याचेही समोर आले आहे. खराब अन्नामुळे त्यांना विषबाधा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पावसाळ्यात हा कचरा नाल्यांमध्ये गेल्यास प्रदूषण आणि दुर्गंधीची समस्याही वाढू शकते. नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित साठ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, तो नेमका कोणत्या दुकानातून किंवा गोदामातून आला याचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणात एफडीए, वसई-विरार महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







