नवी दिल्ली : देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे आणि खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसाठी अन्न सुरक्षा नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने सर्व अन्न व्यवसायिकांना निर्देश देत स्पष्ट केले आहे की, अन्न कापताना, तयार करताना किंवा त्यावर प्रक्रिया करताना केवळ ‘फूड-ग्रेड’ आणि गंज न लागणाऱ्या सुऱ्या, ब्लेड्स तसेच इतर कापण्याच्या साधनांचाच वापर करावा. काही ठिकाणी गंजलेली, खराब झालेली, रंग दिलेली किंवा निकृष्ट दर्जाची उपकरणे वापरली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. अशा साधनांमुळे अन्नामध्ये अशुद्धता मिसळण्याची शक्यता वाढते आणि ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अन्नाच्या संपर्कात येणारी सर्व उपकरणे फूड-ग्रेड, बिनविषारी आणि गंजरोधक साहित्यापासून बनलेली असणे आवश्यक असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे.
हे निर्देश अन्न कापणे, त्याचे तुकडे करणे, प्रक्रिया करणे, पॅकेजिंग करणे आणि तयार करणे यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांना लागू होतात. यामध्ये सुऱ्या, ब्लेड्स, स्लाइसिंग मशिन्स, कापण्याची साधने आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या इतर उपकरणांचा समावेश आहे. ही सर्व साधने स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवणेही अनिवार्य करण्यात आले आहे. गंजलेली किंवा खराब उपकरणे अन्नात धातूचे कण, रासायनिक घटक आणि जीवाणू मिसळू शकतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. याच पार्श्वभूमीवर राज्यांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना तपासणीदरम्यान विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, अन्न प्रक्रिया उद्योग किंवा इतर अन्न व्यवसायिकांवर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या नव्या नियमांमुळे अन्नातील दूषितपणा कमी होऊन ग्राहकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि उच्च दर्जाचे अन्न उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.







