नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिल्लीतील संसदीय पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाच्या ९ पैकी तब्बल ६ लोकसभा खासदारांनी गैरहजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित हालचालींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पक्ष नेतृत्वाने सर्व खासदारांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने पक्षाने त्यांना खुलासा मागविण्याची नोटीस बजावली आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, मुंबई ईशान्यचे संजय दिना पाटील, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळ-वाशीमचे संजय देशमुख आणि परभणीचे संजय जाधव यांचा समावेश आहे. तर दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, मुंबई दक्षिण-मध्यचे अनिल देसाई आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे हे बैठकीस उपस्थित होते. यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीही बैठकीत सहभाग घेतला.
या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी एकूण खासदारांपैकी दोन-तृतीयांश सदस्यांची आवश्यकता असते. ठाकरे गटाकडे सध्या ९ लोकसभा खासदार असून त्यापैकी नेमके ६ खासदार बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. पक्षाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून संबंधित खासदारांविरोधात शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत काही खासदारांना पक्ष सोडण्यासाठी १५ ते ५० कोटी रुपयांची आमिषे दाखविली जात असल्याचा दावा केला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “जे बैठकीला आले ते आमच्यासोबत आहेत, बाकीचे गद्दार आहेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत ठाकरे गटातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.
बैठकीला दांडी मारणारे ६ खासदार:
१. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
२. संजय दिना पाटील (मुंबई ईशान्य)
३. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
४. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
५. संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम)
६. संजय जाधव (परभणी)







