मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमध्ये केईएम रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद अधिक तीव्र झाला असून, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. महिलांविषयी तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संवेदनशील विषयांवर सार्वजनिक मंचावर बोलताना प्रत्येकाने मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ संदर्भातील वक्तव्यामुळे विविध स्तरांतून टीका होत असताना महाराष्ट्र सायबर विभाग यांनी आक्षेपार्ह आणि अश्लील आशयाच्या आरोपांवरून प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, डॉ. सेजल पवार आणि अन्य संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केईएम रुग्णालय चे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनी दोन वरिष्ठ प्राध्यापकांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर रितू तावडे यांनी संबंधित प्रकारावर नाराजी व्यक्त करत स्टँड-अप कॉमेडी शोच्या स्वरूपाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.
रितू तावडे यांनी म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असला तरी त्याच्या नावाखाली महिलांचा अवमान, अश्लीलता, घृणास्पद वक्तव्ये किंवा समाजात चुकीचा संदेश देणारा आशय स्वीकारला जाऊ शकत नाही. त्यांच्या मते, काही स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमांमधून वादग्रस्त विधानांना प्रोत्साहन मिळत असून त्याचा तरुणांच्या मानसिकतेवरही परिणाम होत आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मुंबईत स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदी घालण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. “आई-वडील मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून मुलांना उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवतात. वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत आणि खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत जबाबदारीच्या पदावर जाणाऱ्या व्यक्तींनी आक्षेपार्ह विधाने करणे योग्य नाही,” असे त्यांनी नमूद केले. मुंबई ही संस्कृती, कला आणि विचारस्वातंत्र्याची नगरी असली तरी समाजाच्या मूल्यांना धक्का देणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. माफी मागून प्रकरण संपत नाही, कारण व्यक्तीच्या वक्तव्यांतून त्यांची विचारसरणी आणि संस्कृती दिसून येते, असे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.







