मुंबई : बनावट औषधे, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत कांदिवलीतील चारकोप परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान भेसळयुक्त रबडी कुल्फीचा साठा जप्त करण्यात आला. एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरातील के. सी. इंजिनीअरिंग या रबडी कुल्फी उत्पादक आस्थापनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पामतेल आणि स्टार्चचा वापर करून तयार करण्यात आलेले ‘फ्रोजन डेसर्ट’ हे उत्पादन रबडी कुल्फी म्हणून विक्रीसाठी तयार करण्यात आल्याचे आढळून आले. याशिवाय खाद्यपदार्थांच्या आवरणावरील माहिती आणि प्रत्यक्ष वापरण्यात आलेल्या घटकांमध्ये विसंगती असल्याचेही निदर्शनास आले. तसेच विनालेबल क्रीमचा साठाही अधिकाऱ्यांना आढळला.
या कारवाईत सुमारे ५८.४ किलो वजनाची आणि १७ हजार ४०० रुपये किमतीची रबडी कुल्फी जप्त करण्यात आली. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी, सहाय्यक आयुक्त (अन्न) मेघना पवार तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय रायकर आणि लखन मुखीरवाड यांनी ही कारवाई केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रबडी कुल्फी म्हणून विक्रीसाठी तयार करण्यात आलेले उत्पादन आणि क्रीम या दोन्ही बाबतीत अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत दिशाभूल करणारी माहिती देण्यासंबंधीच्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे संबंधित अन्नपदार्थांचा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, सर्व अन्न व्यवसाय चालकांनी उत्पादनांचे लेबलिंग, घटक पदार्थांची अचूक घोषणा आणि जाहिरातींसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.







