मुंबई : ‘आरे–कफ परेड भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवर मोबाइल नेटवर्क सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर या समस्येवर तोडगा निघत असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) टप्प्याटप्प्याने मोबाइल नेटवर्क सेवा सुरू करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरापासून आरे ते आचार्य अत्रे चौक स्थानकांदरम्यान मोबाइल नेटवर्क कार्यान्वित करण्यात आले आहे. लवकरच आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या उर्वरित टप्प्यातही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो ३ चा आरे–बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये, तर बीकेसी–आचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ मध्ये सुरू झाला होता. त्या वेळी जिओ वगळता काही कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध होते. मात्र कफ परेडपर्यंतचा टप्पा सुरू झाल्यानंतर नेटवर्क सुविधेअभावी प्रवाशांची गैरसोय वाढली. त्यातच मार्च २०२६ पासून आरे–आचार्य अत्रे चौकदरम्यान उपलब्ध असलेली सेवा देखील बंद झाल्याने संपूर्ण मार्गिकेवर संपर्क तुटण्याची समस्या निर्माण झाली होती.
दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीसंदर्भातील वादामुळे मोबाइल कंपन्यांनी नेटवर्क सेवा देण्यास नकार दिल्याने ही समस्या उद्भवली होती. मात्र एमएमआरसी आणि दूरसंचार कंपन्यांमधील चर्चा यशस्वी ठरल्यानंतर स्थानके आणि बोगद्यांमध्ये आवश्यक उपकरणे बसविण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार आता एअरटेलने आरे–बीकेसीदरम्यान सेवा सुरू केली असून वोडाफोनची सेवा आरे–आचार्य अत्रे चौकपर्यंत उपलब्ध झाली आहे. जिओकडूनही उपकरणे बसविण्याचे काम सुरू असून त्यांची सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्यातही नेटवर्क सुविधा उपलब्ध करण्याचे काम वेगाने सुरू आहे. संपूर्ण आरे–कफ परेड मार्गिकेवर सर्व प्रमुख दूरसंचार कंपन्यांची अखंडित नेटवर्क सेवा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. मोबाइल नेटवर्कच्या अभावामुळे अनेक प्रवासी मेट्रो ३ चा वापर टाळत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता नेटवर्क सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.







