सिंधुदुर्ग : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दरवर्षी गणेशोत्सव आणि पर्यटन हंगामात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रेल्वे आणि बस सेवांबरोबरच हवाई वाहतुकीची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याचा विचार राज्य शासनाकडून केला जात आहे. यासंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत नवी मुंबई आणि चिपी विमानतळांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियांवरही चर्चा करण्यात आली.
याशिवाय आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त विमान उड्डाणांची व्यवस्था करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सवादरम्यान मुंबई आणि परिसरातून हजारो चाकरमानी कोकणात जात असल्याने वाहतुकीवर मोठा ताण येतो. अशा परिस्थितीत विमानसेवा सुरू झाल्यास प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः मुंबई ते सिंधुदुर्गदरम्यानचा प्रवास कमी वेळेत पूर्ण करता येणार असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कोकणातील नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिकांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार असून तिच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवी मुंबई-चिपी विमानसेवा प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






