मुंबई : मुंबईतील बहुप्रतीक्षित जल मेट्रो प्रकल्पाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून या प्रकल्पासाठीची पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल झाली आहे. ‘कॅन्डेला पी-१२’ या अत्याधुनिक इलेक्ट्रिक फेरीचा जलविमान कंपनीच्या ताफ्यात समावेश करण्यात आला असून ती २७ मे रोजी जवाहरलाल नेहरू बंदर (JNPT) येथे पोहोचली आहे. सध्या ही फेरी कस्टम क्लिअरन्सच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. कस्टम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या फेरीची सविस्तर चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतरच नियमित सेवेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. विक्रेत्या कंपनीच्या दाव्यानुसार, ही फेरी वाहत्या पाण्यातही सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी सक्षम आहे. मात्र मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण करणे आवश्यक मानले जात आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने एकूण ११ कॅन्डेला पी-१२ फेरी मागवल्या आहेत. या हाय-स्पीड इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी ताशी ४० किलोमीटर वेगाने धावू शकतात आणि एका वेळी ३० प्रवाशांची वाहतूक करू शकतात. सुरुवातीला गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग आणि मांडवा ते वर्सोवा-मढ या दोन मार्गांवर सेवा सुरू करण्याची योजना आहे. राज्य सरकारचे मुंबईत ३४० किलोमीटर लांबीचे जल मेट्रो जाळे उभारण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी सुमारे ६५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई परिसरात २१ विद्यमान मार्गांवर २० स्थानके आणि १६ नवीन जलमार्गांवर २४ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. तसेच २०१ इलेक्ट्रिक आणि हायब्रिड फेरींची खरेदीही करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी आणि उपनगरी रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून कोची जल मेट्रोच्या यशानंतर देशातील अनेक शहरांमध्ये अशा सेवांचा विस्तार करण्याची तयारी सुरू आहे.






