मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जून २०२६ रोजी विविध विकास योजनांचे लोकार्पण आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी ६ वाजल्यापासून हा विशेष कार्यक्रम रंगणार असून ‘गुलाबी साडी’ आणि ‘लाल लाल बांगडी’ या लोकप्रिय गीतांमुळे प्रसिद्ध झालेला गायक संजू राठोड सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सोहळ्याबाबत एसटीप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक अध्यक्षस्थानी राहतील. एसटी महामंडळाचे सदिच्छा राजदूत रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्यासह राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उपमहापौर संजय घाडी, महापौर रितू तावडे आणि इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
वर्धापन दिनानिमित्त एसटी महामंडळाने राज्यभरातील आगार परिसरात ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. तसेच १ जूनपासून सर्व बसस्थानकांवर स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात येणार असून बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली होती. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या ७८ वर्षांपासून एसटीने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासी सेवा दिली आहे. आजही आर्थिक आव्हाने आणि विविध अडचणींवर मात करत डोंगरदऱ्यातील दुर्गम वाड्या-वस्त्या तसेच आदिवासी पाड्यांपर्यंत सेवा पोहोचवत लालपरी जनतेच्या सेवेत अखंड कार्यरत आहे.







