रायगड : किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दि. ३० व ३१ मे २०२६ या दोन दिवसांसाठी रायगड किल्ल्यावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहेत. यंदा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार ६ जून तर तिथीनुसार २६ जून रोजी साजरा होणार असून, राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, पर्यटकांची सुरक्षितता आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना सुरू केली आहे. मार्ग प्रकल्प विभाग, महाड यांच्या माहितीनुसार, २०२३ मधील शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी महादरवाजाखालील उंच कड्यावरून दगड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा सोहळ्यापूर्वी धोकादायक आणि सैल झालेले दगड हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
ही मोहीम दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांच्या प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने ३० आणि ३१ मे रोजी पार पडणार आहे. काम सुरू असताना पायी मार्गाने ये-जा करणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून पायरी मार्ग पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड तसेच दुर्गवीर प्रतिष्ठान यांना आवश्यक ती खबरदारी घेऊन काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना चित्त दरवाजा, नाणेदरवाजा आणि शिर्काई मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या कालावधीत रायगड रोपवे सेवा नियमित सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होत असतात. पावसाळ्यापूर्वी गड परिसरात सैल झालेली माती, दगड आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस आपत्ती व्यवस्थापनाची विशेष मोहीम राबविली जाते.







