पिंपरी : मोटार वाहन नियमांचे उल्लंघन आणि थकीत कराच्या कारणावरून जप्त करण्यात आलेली तब्बल ९३ वाहने आता ऑनलाइन लिलावातून विक्रीस काढण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय च्या वायुवेग पथकाने ही कारवाई केली असून, संबंधित ई-लिलाव १० जून २०२६ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत पार पडणार आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये बस, टेम्पो, डंपर, कार, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहनमालकांना वारंवार नोटीस पाठवून थकीत कर भरून किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वाहने ताब्यात घेण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, अनेक वाहनमालकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर लिलावाचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन विभागाने वाहनमालकांना लिलावापूर्वी शेवटची संधी देत संबंधितांनी कार्यालयाशी संपर्क साधून आपली वाहने सोडवून घ्यावीत, असे आवाहन केले आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, वाहनांवर दावा करणारे चालक, मालक किंवा वित्तदाता यांनी मुदतीपूर्वी कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक राहणार आहे. अन्यथा लिलावानंतर कोणतीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून इच्छुकांना अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून सहभाग घ्यावा लागणार आहे. तसेच लिलाव प्रक्रिया रद्द करणे, तहकूब ठेवणे किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार परिवहन विभागाकडे राखीव ठेवण्यात आला आहे. लिलावात समाविष्ट वाहनांची पाहणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड RTO कार्यालय परिसर, राजगुरूनगर आणि मंचर बस स्थानक येथे कार्यालयीन वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार थकीत कर, प्रलंबित परवाना नूतनीकरण आणि कागदपत्रांची पूर्तता नसलेली वाहने रस्त्यावर फिरत असल्याने वायुवेग पथकाकडून नियमित तपासणी केली जात आहे. या संदर्भात राहुल जाधव यांनी सांगितले की, “नियमभंग आणि थकीत करामुळे जप्त करण्यात आलेल्या ९३ वाहनांचा १० जून रोजी ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहे.”






