वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या १९ व्या हंगामातील प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, यंदाचा महाअंतिम सामना सलग दुसऱ्यांदा अहमदाबादच्या भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. याशिवाय क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी म्हणजे हिमाचल प्रदेशातील नयनरम्य धर्मशाळा शहरात प्रथमच आयपीएल प्लेऑफचा सामना आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएलच्या पारंपरिक नियमानुसार गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर अंतिम सामना होण्याची अपेक्षा असते. त्यामुळे यंदाची फायनल बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या रोड शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही जणांचा मृत्यू झाल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सुरक्षा आणि लॉजिस्टिक्सचा विचार करून अंतिम सामना पुन्हा अहमदाबादला देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी २०२२, २०२३ आणि २०२५ मध्येही नरेंद्र मोदी स्टेडियमवर यशस्वीपणे अंतिम सामने आयोजित करण्यात आले होते.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्लेऑफचे सामने तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमधील ‘क्वालिफायर-१’ सामना २६ मे २०२६ रोजी धर्मशाळेतील एचपीसीए (HPCA) स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल इतिहासात प्रथमच धर्मशाळेत प्लेऑफचा सामना होत असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे. त्यानंतर ‘एलिमिनेटर’ आणि ‘क्वालिफायर-२’ हे दोन्ही महत्त्वाचे सामने न्यू चंदीगड येथील नव्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अनुक्रमे २७ आणि २९ मे रोजी खेळवले जातील. अखेर ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले की, स्थानिक क्रिकेट संघटना आणि प्रशासनाशी चर्चा करून तसेच सुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करत ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. बंगळुरूमध्ये काही तांत्रिक आणि सुरक्षा संदर्भातील अडचणी असल्यामुळे तेथे अंतिम सामना आयोजित करणे शक्य नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आयपीएल २०२६ च्या अंतिम टप्प्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.







