मुंबई : मुंबईतील नेहरू सेंटर आणि नेहरू सायन्स सेंटर येथे २०२६ च्या उन्हाळ्यात विद्यार्थ्यांसाठी आणि कला-प्रेमींसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये १८ ते २३ मे २०२६ दरम्यान विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत, ज्यामध्ये नामवंत गुरूंचे मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यशाळांमध्ये ‘कथ्थक दर्पण’ अंतर्गत शाश्वती सेन यांचे मार्गदर्शन, ‘लय और ताल’ (तबला) साठी कालिनाथ मिश्रा, अभिनय कार्यशाळेसाठी डॉ. मिलिंद इनामदार, ‘लावणी माझी सखी’साठी नंदकुमार पाटील आणि ‘सूर और ताल’ (हार्मोनियम) साठी विश्वनाथ कान्हेरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळा विनामूल्य असल्या तरी प्रवेशासाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रकाश पवार (९८२०३५६७६६) किंवा अक्षय भोसले (७२०८७५७५८९) यांच्याशी संपर्क साधावा.







