नवी मुंबई : राज्यात भोंदू बाबांच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या चिंतेदरम्यान नवी मुंबईत काळी जादू व अघोरी विधीच्या नावाखाली एका महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना अटक केली. स्वतःला ‘बाबा’ म्हणून ओळख देणाऱ्या आरोपींनी पीडित महिलेला तिच्यावर काळी जादू झाल्याचे भासवले आणि विविध पूजा-विधी करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम उकळली. महिलेने रोख तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे सुमारे १ लाख ९० हजार रुपये दिल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून विशेष पथकाची स्थापना केली. तपासादरम्यान आरोपी नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून अर्जुन भरत चव्हाण (२९) आणि सागर शिवाजी शिंदे उर्फ ‘एकलहरी बाबा’ (२४) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन केले असून या घटनेमुळे अंधश्रद्धांविरोधात सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.







