वसई : वसई मोहिमेच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ २८८ वा ‘वसई विजयोतस्व’ १ ते ३ मे दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. वसई-विरार महानगरपालिकेतर्फे आयोजित या सोहळ्याला वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ आणि वसई विजय स्मारक समितीचे सहकार्य लाभणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण जंजिरे वसई किल्ला असून १ मे रोजी वज्रेश्वरी देवी मंदिरापासून मशाल यात्रेने उत्सवाची सुरुवात होईल. बाईक रॅलीद्वारे पारनाका येथे पोहोचलेल्या यात्रेचे सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात किल्ल्याकडे प्रस्थान होईल. यावेळी तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक आणि आगीच्या चक्रांसारख्या पारंपरिक युद्धकलांचे थरारक सादरीकरण आकर्षण ठरणार आहे. त्याच दिवशी ‘महाराष्ट्र दर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२ मे रोजी ‘शिवरायांचे संरक्षण व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान आणि ‘मी मराठी’ या लोककलेचा कार्यक्रम सादर होईल, तर ३ मे रोजी इतिहास अभ्यासकांसोबत किल्ला सफर आणि ‘शिवदर्शन’ बॅले डान्स होणार आहे. या विजयोत्सवात सायंकाळी ४ ते १० दरम्यान शिवकालीन ५०० हून अधिक शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच रायगड व सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या प्रतिकृतींसह आरमाराचे प्रदर्शनही पाहता येईल. बालजत्रा आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा महोत्सव हे विशेष आकर्षण ठरणार असून सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन इतिहासाचा वारसा अनुभवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







