मुंबई : लालबाग परिसरात मिर्ची ग्रूपच्या वतीने ‘गणेशगल्ली प्रीमियर लीग (GPL) २०२६’ या क्रीडा महोत्सवाचे आयोजन ३० एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेची सुरुवात १ मे रोजी भव्य चित्रकला स्पर्धेने होणार आहे. क्रिकेटसह खो-खो, व्हॉलीबॉल आणि कॅरम अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश या महोत्सवात असून, पुरुष गटासोबतच महिला आणि ज्युनियर गटांसाठीही स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत क्रीडा कौशल्याला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेचे वेळापत्रकही आकर्षक ठेवण्यात आले आहे. ३० एप्रिल रोजी उद्घाटन आणि तयारीनंतर १ मे रोजी प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होईल. २ मे रोजी साखळी सामने पार पडतील, तर ३ मे रोजी अंतिम सामने आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. पुरुष गटातील विजेत्या संघाला ३०,००० रुपये आणि उपविजेत्याला २०,००० रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय इतर गटांनाही संधी देत विविध खेळांमधून स्थानिक तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. आयोजकांनी यंदाची स्पर्धा अधिक भव्य आणि उत्साहपूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
स्पर्धेचे स्वरूप व बक्षिसे :
• विजेत्याला ₹३०,००० आणि उपविजेत्याला ₹२०,००० रोख पारितोषिक दिले जाईल.
• महिला आणि ज्युनियर गटांसाठीही क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
• केवळ क्रिकेटच नाही, तर खो-खो, व्हॉलीबॉल आणि कॅरम या खेळांमधून स्थानिक कलागुणांना वाव दिला जाणार आहे.







