पुणे : शहराची वाहतूक व्यवस्था उत्तम करण्यासाठी पोलिसांकडून हाती घेण्यात आलेला इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अर्थात आयटीएमएसचा प्रकल्प अंतिम टप्यात आला असून या माध्यमातून वाहतूक नियम तोडणार्या मंडळींना थेट स्वयंचलित पद्धतीने नियमभंगाचे चलन येणार असल्याचे पोलिस उपमहानिरीक्षक आणि पुण्याच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे (सीप) तर्फे हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉग या कार्यक्रमादरम्यान पाटील बोलत होते. कार्यक्रमाला ग्लोबल सस्टेनिबिलिटी इम्पॅक्ट कोच आणि सेवा ब्रिज फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम, पिनॅकल इंडस्ट्रीजचे आणि ईकेए मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष असलेले डॉ. सुधीर मेहता, क्लायमट ट्रूपर्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नटराजन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या मेडिकल आणि हेल्थ सायन्सेस विभागाचे कुलसचिव प्रो. राजीव येरवडेकर, सीपचे अध्यक्ष शिवराज साबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्याची वाहतूक समस्या हा सध्या गंभीर विषय आहे. १९९५ मध्ये पुणे हे ८६ स्केअर किलोमीटर इतके होते. २०२५ मध्ये ते ३७३ स्केअर किलोमीटरपर्यंत जाऊन पोहचले आहे. त्यामध्ये ३३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्याची वाहतूक व्यवस्था उत्तम करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना सुरु आहेत. त्यामध्ये ट्रॅफिक आणि ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगची टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) आणि एआयचा वापर करून वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार आहे. शहरातील ३२ महत्वाच्या रस्ते निश्चित करून त्यावर काम सुरु करण्यात आले आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले. वाहतुकीचे नियम तोडल्यामुळेच शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मॅपमाय इंडिया, गुगल, टॉमटॉम यांची मदत आम्ही घेत आहोत. शहरांमध्ये नव्याने विकसित होत असणारे रस्ते, उड्डाणपूल यांची उभारणी करण्याआधी योग्य ती माहिती घेऊन काम करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम करण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. पुढल्या पाच वर्षांत पुण्यामध्ये १२० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार होईल. नागरिकांनी देखील सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची गरज आहे.







