नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता घरगुती ग्राहकांना पाईप गॅस म्हणजेच पीएनजी कनेक्शन घेण्याबाबत प्रोत्साहित करत आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक महत्त्वाची घोषणा केली असून, आता घरबसल्या एलपीजी कनेक्शन सोडून देण्याची (सरेंडर) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकांनी आधीच पीएनजी कनेक्शन घेतले आहे, त्यांना आता एलपीजी सिलेंडर जमा करण्यासाठी गॅस वितरकाकडे जाण्याची गरज नाही. सरकारने यासाठी ‘MyPNG-D’ नावाचे ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडीचा वापर करून काही मिनिटांत कनेक्शन रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
- सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळhttps://mypngd.in/ ला भेट द्या.
- तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा एलपीजी आयडी प्रविष्ट करा.
- गॅस कनेक्शन सरेंडर करण्याचा अर्ज सबमिट करा.
- यानंतर गॅस वितरक स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील. ते घरी येऊन कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करतील, सिलेंडर घेऊन जातील आणि तुमची अनामत रक्कम (रिंफंड) परत मिळवून देण्यास मदत करतील.
पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव नीरज मित्तल यांनी माहिती दिली की, पोर्टल सुरू झाल्यानंतर अवघ्या १ दिवसात सुमारे १,७९७ ग्राहकांनी आपली कनेक्शन सोडून दिली आहेत. सरकारच्या नवीन नियमांनुसार, ज्या कुटुंबांनी अद्याप पीएनजीसाठी अर्ज केलेला नाही किंवा अधिकृत संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही, त्यांचा एलपीजी पुरवठा ३ महिन्यांनंतर बंद केला जाऊ शकतो. गॅस वितरण कंपन्या आता ग्राहकांना कॉल, एसएमएस आणि रेकॉर्डेड मेसेजद्वारे संपर्क साधून या बदलाबाबत माहिती देत आहेत. नैसर्गिक वायूचा वापर वाढवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.







