नाशिक : विंचूर येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात रुग्णांना सर्रासपणे मुदत संपलेली औषधे दिली जात असल्याचा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोग्य विभाग थेट नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
विंचूर येथील रहिवासी योगेश सोनवणे हे तीन-चार दिवसांपूर्वी मळमळ आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी या दवाखान्यात गेले होते. यावेळी त्यांना उपचाराचा भाग म्हणून ओआरएसच्या पुड्या देण्यात आल्या. मात्र, त्यांनी या पुड्यांची तपासणी केली असता, त्या डिसेंबर २०२५ मध्येच कालबाह्य झाल्याचे स्पष्ट झाले. ही औषधे घेतल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे माहिती असूनही त्यांचे वितरण केल्याने आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. केवळ औषधांचाच प्रश्न नाही, तर या दवाखान्यात अनेक समस्यांचे माहेरघर बनले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपस्थित नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विंचूरची लोकसंख्या १५ हजारांहून अधिक आहे. महामार्गालगत असल्याने आजूबाजूच्या गावांतील रुग्णही येथे मोठ्या आशेने येतात, मात्र त्यांना रिकाम्या हाताने किंवा खासगी मेडिकलकडे धाव घ्यावी लागते. महत्त्वाच्या औषधांचा साठा नेहमीच अपुरा नसतो, आणि आता उपलब्ध औषधेही चक्क कालबाह्य निघत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कोट्यवधींचा खर्च शासन स्तरावरून होतो मग अशी कालबाह्य औषधे रुग्णालयात का दिली जातात? आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रुग्णांकडून करण्यात येत आहे.







