मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना येत्या तीन महिन्यांत मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण गोरेगाव ते सीएसएमटी ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या बाबतीत नियोजन सुरू असून लवकरच अंमलबजावणी केली जाईल. यामुळे लोकल प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर गेली काही महिने पुनर्विकासाची अनेक कामं सुरू आहेत. डिसेंबर ते जानेवारी पूर्ण एक महिना कांदिवली ते बोरिवली दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम सुरू होतं. यामुळे महिनाभर अनेक लोकल रद्द केल्या होत्या. दिवसाला २००-२५० लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल व्हायचे. पण ते काम पूर्ण होताच लोकल सेवा पुन्हा सुरू झाल्या. तसेच आता हार्बल लाईनवरही याच प्रकल्पा़ंतर्गात मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलं आहे. परंतु, जागेअभावी नव्या मार्गिका उभारण्याचं काम कठिण झालं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेनं वांद्रे-खार येथील रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करून जागा उपलब्ध करण्याचं नियोजन केलं आहे. या पुलाची पाडापाड करण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी मार्गावरील लोकल सेवा तीन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद होणार आहे. वांद्रे ते बोरिवलीदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं आहे. पण, माहीम-सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अद्याप हे काम सुरू झालं नाही. त्यामुळे या ब्लॉकदरम्यान, सीएसएमटी ते वांद्रे लोकल सेवा मर्यादीत स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.







