मुंबई : फायलींमधील ताणतणावात अडकलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी प्रशासनाने नवीन प्रयोग सुरू केला आहे. कार्यालयीन कामे वेळेत आणि वेगाने करण्याबरोबरच आता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. यासाठी रोजच्या कामातून केवळ १० मिनिटे वेळ काढून त्यांना योग प्रशिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. योगाची सुरुवात गृहविभागापासून झाली असून दररोज १० मिनिटे या कर्मचाऱ्यांकडून योगा करून घेतला जात आहे. या काही मिनिटांच्या कसरतीने त्यांच्यावरील तणाव या माध्यमातून दूर केला जात आहे.
मंत्रालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बैठका, विभागीय जबाबदाऱ्या आणि तासनतास एकाज जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे कामाच्या वेळेतूनच दहा मिनिटे वेळ काढून आहे त्या जागेवरूनच या कर्मचाऱ्यांकडून योगा करून घेतला जात आहे. योग आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव राधिका रस्तोगी (अपिल आणि सुरक्षा) यांनी पुढाकार घेऊन योगासनाचा उपक्रम सुरु केला. त्यानुसार आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे सलग पाच दिवस रोज दुपारी चारच्या ठोक्याला योगासने सुरु होतात. ही योगासने फक्त १० मिनिटे चालतात. मरीनलाईन्स येथील कैवल्यधामचे योगशिक्षक मंत्रालयात येऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना योगसानांबाबत धडे देत आहेत. अधिकारी-कर्मचारी आपापल्या जागेवरूनच योगासने करतात. योग शिक्षकांच्या सूचना प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला ऐकू जाव्यात यासाठी विभागात मध्यवर्ती ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे बरोबर चार वाजता अधिकारी-कर्मचारी काम बाजूला ठेवून योगासनाला सुरुवात करतात, अशी माहिती रस्तोगी यांनी दिली.







