मुंबई : मुंबई महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचे उपनियम नुकतेच लागू केले असून अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसुलीची जबाबदारी आता कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. या उपविधीमध्ये दंडाच्या रकमेबाबत शुल्क ठरवण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २५०, कचरा टाकल्यास ५००, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास २०० रुपये आणि रस्त्यावर वाहन धुतल्यास ५०० रुपये दंड होणार आहे. घन कचऱ्याचे संकलन, वहन आणि विल्हेवाट आदी बाबींशी निगडीत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ४६२ (ईई) अंतर्गत बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ तयार करण्यात आले होते. हे अधिनियम बदलण्यात आले असून यामध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.
वाढीव दंडाची नियमावली लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २५०, कचरा टाकल्यास ५००, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास २००, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. ही नियमावली नुकतीच लागू झाली असून या नियमावलीच्या अंमलबजावणीचे काम कनिष्ठ पर्यवेक्षकांना देण्यात येणार आहे. या दंडात्मक कारवाईसाठी प्रत्येक कनिष्ठ पर्यवेक्षकांकडे अधिकृत अधिकारपत्र (सनद) असणे बंधनकारक आहे. सनद नसताना कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे आदेश या पर्यंवेक्षकांना देण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबईत ३५३ कनिष्ठ पर्यवेक्षकांना याबाबतच्या कारवाईचे अधिकार देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान १० ते १२ कनिष्ठ पर्यवेक्षक असतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने दंड वसूल करण्याचा पालिकेचा विचार आहे.
- रस्ते / गल्ल्या / पदपथ / बाग / सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे – ५०० रुपये
- थुंकणे – २५० रुपये
- खुल्या आणि सार्वजनिक जागांवर आंघोळ – ३०० रुपये
- लघवी करणे – ५०० रुपये
- उघड्यावर शौच करणे – ५०० रुपये
- मोकळ्या जागी व सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे – ५०० रुपये
- सार्वजनिक ठिकाणी भांडी / कपडे/ इतर कोणत्याही वस्तू धुणे – ३०० रुपये
- वाहन धुणे – ५०० रुपये
- अंगण स्वच्छ न ठेवणे – एकाच जागेच्या मालकांसाठी / रहिवाशांसाठी ५०० रुपये आणि इतरांसाठी १५०० रुपये
- सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा करून न देणे – २०० रुपये
- घरासमोरील गटार (घराचा नाला) स्वच्छ न ठेवणे – ५०० रुपये
- पाळीव प्राण्यांनी कचरा पसरवणे/शौच करणे- १००० रुपये







