मुंबई : स्टेशनपासून तर कार्यालयांपर्यत घाईगडबडीत धावणाऱ्या डबेवाल्यांच्या चेहऱ्यावर त्या दिवशी थकवा नव्हता… कारण मुंबईतील डबेवाल्याच्या मुलागा नगरसेवक झाला होता. प्रभाग क्रमांक ४ मधून शिंदेसेनेचे उमेदवार मंगेश पांगारे यांनी विजय मिळवला असून, त्यांच्या यशामुळे डबेवाला कुटुंबात आणि संपूर्ण डबेवाल्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांचा सामान्य कष्टकरी कुटुंबातून पुढे येत लोकप्रतिनिधी बनण्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मंगेश पांगारे हे डबेवाला कामगाराचे सुपुत्र आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा अनेक वर्षे डबेवाला म्हणून काम करत होते, तर आजही त्यांचे काका डबे पोहोचवण्याचे काम करतात. कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिस्त या मूल्यांवर वाढलेले मंगेश आज नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. या विजयामुळे डबेवाला कुटुंबाचा संघर्षाचा प्रवास एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचला आहे. या आनंदाच्या क्षणी मंगेश यांचे काका सीताराम पांगारे यांनी ग्रँट रोड स्थानक परिसरात कामगारांमध्ये मिठाई वाटून आनंद साजरा केला. डबेवाला असोसिएशनचे प्रतिनिधी आणि कामगारांनी एकत्र येत हा ऐतिहासिक क्षण उत्साहात साजरा केला. डबेवाला कुटुंबातील व्यक्ती नगरसेवक झाल्याने सर्वांनाच विशेष अभिमान वाटत असल्याचे मत डबेवाला असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आले.
डबेवाला कामगारांसाठी महापालिकेने पूर्वी विशेष वैद्यकीय सेवा देण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता मंगेश पांगारे नगरसेवक झाल्याने या विषयावर लवकर निर्णय घेतला जाईल, अशी आशा डबेवाला संघटनेने व्यक्त केली आहे. अनेक वर्षे सेवा देणाऱ्या या कामगारांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, डबेवाले हे फेरीवाले नसतानाही काही भागात त्यांच्या सायकली जप्त केल्या जातात आणि दंड आकारला जातो. ही कारवाई अन्यायकारक असल्याची भावना डबेवाला समुदायात आहे. नव्या नगरसेवकाच्या माध्यमातून हा अन्याय थांबेल आणि डबेवाला कामगारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डबेवाला कामगाराच्या घरातून नगरसेवक निवडून येणे हे केवळ एका व्यक्तीचे यश नाही, तर संपूर्ण कष्टकरी समाजाच्या संघर्षाचे प्रतीक आहे. मंगेश पांगारे यांच्या विजयामुळे डबेवाला कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, अशी आशा बळावली आहे. हा प्रवास अनेक तरुणांसाठी नवी दिशा दाखवणारा ठरत असून, मेहनत आणि चिकाटीने कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.







