मुंबई : मुंबईचे ‘मुंबईपण’ अधोरेेखित करताना १०० युनिटपर्यंत बेस्टच्या ग्राहकांना मोफत वीज, बेस्टच्या बस प्रवासाचे दर कमी करणे, विशेष बसेसमध्ये महिला व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, ७०० चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर माफ अशा विविध आश्वासनांचा ‘मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा’ रविवारी प्रसिद्ध करण्यात आला.
शिवसेना (ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वचननामा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. ‘शब्द ठाकरेंचा’ असे या वचननाम्याला नाव देण्यात आले असून, मुखपत्रावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव व राज ठाकरे बंधूंचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी हा ‘शिवशक्तीचा वचननामा’ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मुंबईचे मुंबईपण जपण्यासाठी शहराची जुनी ओळख कायम ठेवली जाईल. या वचननाम्याच्या निमित्ताने मुंबईतील जमिनी या मुंबईकरांसाठीच राहतील असे आश्वासन देण्यात आले आहेत. महापालिकेच्या जमिनी या खासगी विकासकांच्या घाशात न घलता त्याठिकाणी शासकीय महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामागारांना घरे देण्यात येतील. मुंबई महापालिकेचे स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण असेल.







